पत्रकार आंदोलनात : वाळू तस्करी जोरात, महसूल अधिकाऱ्यांचा कोडगेपणा

दत्ता पवार
पर्यावरण संरक्षणासाठी जगभर मोठे प्रयत्न होत आहेत. याचाच भाग होत पत्रकार सूरज निकम याने वाळू तस्करी पकडली. त्याचा उद्देश साफ आणि पाक होता. पण महसूल अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वाळू तस्करांकडून हल्ला घडवून आणला. याच्या निषेधार्थ पत्रकार एकवटले आहेत. त्यांचे विट्यात आंदोलन सुरू आहे. पत्रकार आंदोलनात असताना महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू तस्करी जोरात सुरू आहे. यातून महसूल अधिकाऱ्यांचा कोडगेपणा समोर येत आहे.
वाळू तस्करांची भिक्षा
येरळा नदी दुष्काळी भागाची वरदायिनी आहे. दुष्काळी भाग संपन्न करणाऱ्या येरळेला लोकांनी दैवत्वाचा दर्जा दिला आहे. येरळेतील वाळू उपशावर बंदी आहे. वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. पण महसूल यंत्रणेच्या खुल्या पाठिंब्याने वाळू तस्करांनी येरळा नदीतील वाळूचा सुफडासाफ केला आहे. वाळू तस्करांकडून मिळणाऱ्या मालिद्यावर अधिकारी गब्बर झाले आहेत. वाळू रक्षक वाळू तस्करांकडून भिक्षेच्या रूपाने दान स्वीकारत आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हाताने ही मंडळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करतात. हा स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान आहे. नीती आणि नीतिमत्ता गमावून बसलेले महसूल अधिकारी निर्ढावले आहेत.
“टिपे”ला पुढे चाल
येरळा नदीतील वाळू तस्करी रोखावी, हा उद्देश सुरज जगताप याचा होता. त्याने वाळू तस्करीची टीप तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना दिली. या टिपेला पुढे चाल देत तहसीलदारांनी वाळू तस्करांना बातमी दिली. हा आरोप पत्रकारांचा आहे. वाळू तस्करांनी सूरज याला बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ पत्रकारांचे विट्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्व पक्षीय पाठींबा आहे. विटा व कडेगाव शहरे बंद ठेवण्यात आली. आंदोलनाची धार वाढली आहे. पत्रकार वाळू तस्करांविरोधात आंदोलनात असताना, महसूल अधिकाऱ्यांच्या कृपेने खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. महसूल विभागाच्या कोडगेपणावर सर्व स्तरातून टीकेचा भडिमार सुरू आहे.