पत्रकार सरंक्षण कायद्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला गुन्हा : वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या; तहसीलदार व प्रांताधिकारी रडारवर

दत्ता पवार
लोकशाहीत पत्रकार समाजाचा तिसरा डोळा म्हणून काम करतोय. चौथास्तंभ म्हणून ओळखणारा पत्रकार अनेक अडचणींचा सामना करीत आहे. समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. माफियांकडून हल्ले होत आहेत. याला अधिकारी खतपाणी घालत आहेत. पण पत्रकार याला डरला नाही. असाच प्रसंग कडेगाव तालुक्यातील एका पत्रकारांवर गुदरला. यामागं वाळू माफिया आणि त्यांना साथ देणारे महसूल अधिकारी होते. पत्रकारांवरील अन्यायाविरुद्ध पत्रकार एकवटले आणि ताकत दाखवून दिली. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिला गुन्हा नोंद झाला. हा गुन्हा नोंद होताना पत्रकारांना प्रशासकीय बाबूंचा चांगला अनुभव आला. पण पत्रकार मागे हटला नाही. वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करूनच पत्रकार संघटना शांत झाली. या प्रकरणात कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील आणि प्रांताधिकारी गणेश मरकड यांची चौकशी सुरू आहे.
कडेगाव तालुक्यातून प्रसिद्ध अशी येरळा नदी वाहते. येरळा नदीची वाळू दर्जेदार आणि कसदार अशी ख्याती आहे. येरळा नदीच्या वाळूला भारी डिमांड आहे. या परिसरात वाळू माफियांच्या मोठ्या फौजा आहेत. त्यांच्या दिमतीला महसूल विभागाचे कवचकुंडले आहेत. यामुळे वाळू माफिया बेफाम झाले आहेत. या बेफामगिरीतून त्यांनी सूरज जगताप या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याला कडेगाव तहसीलदार व प्रांताधिकारी यांचं बळ असल्याचा संशय पत्रकारांचा आहे. वाळू माफिया व अधिकाऱ्यांविरोधात विट्यात पत्रकारांनी जबरी आंदोलन उभं केलं. या आंदोलनाचं फलित पत्रकारांच्या पदरी पडलं. वाळू तस्करांवर पत्रकार सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. पत्रकार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी प्रशासनाला तहसीलदार व प्रांताधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी लावण्यास भाग पाडले. पत्रकारांचा हा लढा माफिया आणि अधिकाऱ्यांविरोधात होता. यात पत्रकार सरस ठरले.