आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते सेवानिवृत्त शिक्षिकांचा सत्कार

सह्याद्री दर्पण
शिक्षणाने समाज घडतो, समाजाचा उद्धार होतो. शिक्षण ही ज्ञानाची गंगोत्री आहे. पवित्र क्षेत्रात काम करण्याचं भाग्य लाभतं. हे भाग्य लाभणाऱ्या सौ. शोभा चव्हाण व सौ. विजया कोळेकर या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा सत्कार करताना मला आंनद होत आहे, असे प्रतिपादन वनश्री आमदार मोहनराव कदम यांनी केले.
जि. प. शाळा चिंचणी ( अं ) शाळेच्या वरिष्ठ मुख्याद्यापिका सौ. शोभा चव्हाण व उपशिक्षिका सौ. विजया कोळेकर या सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार वनश्री आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईगडे हे प्रमुख पाहुणे तर गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ संपन्न झाला.
गटविकास अधिकारी दाजी दाईगडे म्हणाले की, नोकरीत असताना कामाचा दबाव, तणाव असतो. सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत असताना यात अधिकची वाढ होते. सेवानिवृत्ती अगोदर कामांचा उरक करण्याची लगबग होते. सेवानिवृत्त झाल्याचं समाधान मिळतं. पण ठराविक कालावधीनंतर मन उदास होतं. सेवानिवृत्तीनंतर आपण आरोग्य जपलं पाहिजे. व्यायामावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे.
गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी म्हणाले की, शिक्षकी पेशात काम करण्यासाठी भाग्य लागतं. जगातल्या सर्वात पवित्र क्षेत्रात आपण काम करतोय. आपली नोकरी हे उपजीविकेचे साधन आहे. नोकरीचे कर्तव्य पार पाडत असताना, आपल्या जवळच्या नात्यापासून दूर जातो. आपण आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानून उभं आयुष्य सेवा करतो. सेवाकाळात सुख- दुःखाचे प्रसंग येत असतात. त्याला आपण कसं सामोरं जातो, ते महत्वाचं असतं.
यावेळी विस्तार अधिकारी विकास राजे, केंद्रप्रमुख विलास शेळके, रमजान मुल्ला यांची भाषणे झाली. यावेळी केंद्रप्रमुख अशोक महिंद चिंचणीचे सरपंच व उपसरपंच, वांगीचे सरपंच व उपसरपंच, पाडळीचे सरपंच व उपसरपंच, विलास माने, विठ्ठल कोळेकर, चिंचणी केंद्रातील शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, शिक्षक संघाचे व शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक सुदाम होलमुखे यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ पाटसुपे यांनी केले. आभार सूर्यकांत जगदाळे यांनी मानले.