नामदार साहेबांच्या विकासकामांची हजार कोटींकडे धाव !

दत्ता पवार
स्पर्धेत स्पर्धक समोर दिसत नाही, त्यावेळेला त्याला विसावा टाकावासा वाटतो. पण विसावा शब्दाला आसपासही फिरकू न देणाऱ्या विजेत्याला विसाव्याची उसंत नसते. निष्णात स्वतःशी स्पर्धा करतो. अशाच निष्णात स्पर्धकाने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ ढवळून काढला आहे. या स्पर्धकाची आपलाच रेकॉर्ड मोडण्याची स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा धावपट्टीवरील नसून विकासकामांच्या खेळपट्टीवरील आहे. विकासकामांच्या आकडेवारीने एक हजार कोटींच्या दिशेने धाव घेतली आहे. एव्हढा मोठा विकासकामांचा आकडा बोलती अडखळणारा ठरत असला, तरी हे वास्तव आहे. या वास्तवाला मूर्त स्वरूप देणारा जिगरबाज नेता या मतदारसंघाला लाभला आहे. या नेत्याचं नाव नामदार डॉ. विश्वजीत कदम असं आहे. नावातच विश्वजीत असल्यानं त्यांच्या विकासकामांची पताका जेत्याच्या थाटात फडकत आहे.
सामाजिक क्रांती घडविणाऱ्यांची महाराष्ट्र खाण आहे. या खाणीत स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब हिऱ्याच्या लखलखाटात तेजोमय झाले होते. ही अतिशयोक्ती वाटेल पण सत्य आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला सारून पाहिल्यास कदम साहेबांचं कर्तृत्व लखलखणारं दिसून येतं. सामाजिक कार्याचा नवा मापदंड, आदर्श निर्माण करणारे साहेब हयात नाहीत. पण त्यांचा वारसा जपणारा बुलंद वारसदार दमदार कामगिरी करताना, उभा महाराष्ट्र पाहतोय. ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी मागील अडीच वर्षांत रेकॉर्ड ब्रेक काम केलं आहे. त्यांचं गुणगान करणं हा उद्देश नसून त्यांनी विकासाची भरारी घेतली आहे, त्याचं मोजमाप.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ राजकीय सारीपाटावर खिजगणतीतही नव्हता. पण स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या करिष्म्याने, हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणात अव्वल स्थानावर जाऊन पोहोचला. कदम साहेबांच्या माघारी या मतदारसंघाचं कसं, असं वाटत होतं. पण ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढचं पाऊल टाकलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री आहेत. पण त्यांच्या विकासकामांचा दर्जा कॅबिनेट मंत्र्याला फिकं पाडंल, असंच राहिलं आहे. मंत्री मंडळातील जेष्ठ मंत्र्यांचे ते लाडके आहेत. यातच त्यांनी समाधान न मानता विकासात्मक बाबतीत अचूक फायदा उठविला आहे.
यामुळेच पलूस-कडेगाव मतदारसंघ विकासकामांनी खचाखच भरून गेला आहे. मतदारसंघातील विकासकामांची यादी पाहिल्यास, कोणतंही खातं शिल्लक राहिलंय, असं वाटत नाही. मतदारसंघात नामदर साहेबांनी विकासकामांचा रतीब घातला आहे. हर दिवसाला त्यांच्या विकासकामांची बातमी कानावर येऊन आदळते. अडीच वर्षांत त्यांच्या विकासकामांची जंत्री 800 कोटींपर्यंत जाऊन पोहोचली. हा वेग पाहता 1 हजार कोटींचा टप्पा लवकरच गाठतील, असाच त्यांच्या कामाचा वेग दिसून येत आहे. लवकरच ते एक हजार कोटींच्या विकासकामांचा किर्तीमान स्थापित करतील, याची कोणतीच शंका उरत नाही.