पलूस – कडेगाव मतदारसंघ सोशल मीडियावर धुमसतोय

दत्ता पवार
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घडामोडीचे काय होणार याची उत्सुकता ताणली आहे. महाराष्ट्रभर सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्त्यांच्या चकमकी झडत आहेत. सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला आहे. पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरू आहे.
राज्यातील अतिसंवेदनशील म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. हा मतदारसंघ राजकीय सारीपटावर कमालीचा जागृत आहे. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप या पक्षात हाडवैर आहे. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस ताकद दाखवताना दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत आहे. पदवीधर निवडणुकीत अरुण अण्णा लाड विजयी झाल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सख्य वाढले आहे.
राज्याचे राजकारण कोणत्या वळणावर जाईल याचे काही सांगता येत नाही. महाविकास आघाडी सत्तेत राहते की, पायउतार व्हावे लागते. याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मागील अडीच वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सत्ता असल्यामुळे जोमात होते. भाजप कार्यकर्ते काहीसे मागील पावलावर होते. सत्ता नाट्याच्या घडामोडीमुळे भाजप कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर दोन्ही गटाकडून जबरदस्त टीका-टिप्पणी केली जात आहे. एकदम टोकाची टीका – टिप्पणी होत असल्याने वातावरण तापत आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डॉ. विश्वजीत कदम मंत्री आहेत. भाजपचे संग्राम देशमुख आगामी विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आहेत. दोन्ही गटाकडून खालच्या स्तरावर जाऊन उकाळ्या-पाकाळ्या काढल्या जात आहेत. मुळातच हा मतदारसंघ अतिसंवेदनशील त्यात सोशल मीडियाची भर पडल्याने, वादाने टोकाची सीमा ओलांडली आहे.