ताज्या घडामोडी

बंडाचा मुद्दा हिंदुत्व; मग खाते वाटपाचा गोंधळ का ?

Spread the love

दत्ता पवार

धर्म समाज जीवनाचा आत्मा. धर्म संस्कृती आणि संस्काराचं पीठ. पण धर्माचं राजकीयकरण सुरू आहे. राजकारणातला धर्म बेडगी ठरतो आहे, याची अनुभूती रोज येते. ठाकरेशाही उलथवून शिंदेशाही आली. याच शिंदेशाहीने त्यांच्या बंडाला हिंदुत्वाचा मुलामा दिला. हा मुलामा आता गळून पडला आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खातेवाटचा गोंधळ. हिंदुत्व अजेंडा असेल तर मलाईदार खात्यांचा रतीब कशासाठी ? मग बंडाचा हिंदुत्व मुद्दा तकलादू होता काय ?

धर्म, धर्माचा प्रचार, प्रसार करायला धर्म पंडित सक्षम आहेत. हीच आपली परंपरा आणि रीत आहे. राजकारणात धर्म आला आणि खरा आणि खोटा धर्मवाद बोकाळला. राजकारणातला धर्मवाद खरंच उपयुक्त आहे ? हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणातील धर्मांदतेने समाजाची मते, मने विखारी आणि विषारी बनवली आहेत. विखारी प्रसार, प्रचाराने धर्म महत्वहीन करून टाकला आहे. मात्र राजकारणातील संधीसाधूपणा कमी होताना दिसत नाही. धर्माच्या नावावर सध्याचं राजकारण पिंगा घेत आहे. राजकारणातील तथाकथित धर्मवादाने समाजमन कलुषित झालं आहे. तकलादू धर्मवादाला विरोध करणारा धर्मद्वेष्ठा ठरत आहे.

महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच सत्तांतर झालं. तेही बंड करून. अडीच वर्षे कोपरापासून ढोपरापर्यंत वरपून झाल्यानंतर बंडवाल्यांना धर्म आठवला. धर्म आठवला बरं झालं म्हणणारा मोठा वर्ग आहे. बंडावेळी धर्माचा ढोल आणि तोंडाचा पिटारा उघडणारे बरेच जण नाराज आहेत. त्यांच्या मते धर्म वाढवा, रुजावा म्हणून त्यांना मंत्रिपद हवे होते. त्यांना मंत्री केले नसल्यामुळे धर्मावर भली मोठी आफत आली ? त्यांच्या ढोंगीपणाची आणि धर्माच्या बेडगीपणाची पोलखोल झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता मलईदार आणि चटकदार खात्यांसाठी शिंदे गट आणि भाजपात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. भाजप – शिंदे गट हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र आला असेल, तर मंत्रिपदाच्या खुराकावरून लढतात का ? खाती वाटपाचा घोळ स्वफायद्याचा की, जनतेच्या भल्याचा ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!