निर्दयी बापाने अडीच वर्षाच्या मुलाला आपटून जीवे मारले : कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथील घटना

सह्याद्री दर्पण
पती – पत्नीच्या भांडणात अडीच वर्षाच्या मुलाला फरशीवर आपटून जीवे मारले. ही घटना कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथे दि. 19 सायंकाळी 7 . 30 च्या सुमारास घडली. आरोपी अर्जुन अनिल सावंत ( वय – 26 ) रा. अंत्रि बुद्रुक ता. शिराळा याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली. याबाबतची फिर्याद पत्नी पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्जुन सावंत हा पत्नी पिंकी व साडेचार वर्षांची मुलगी व अडीच वर्षांचा मुलगा आयुष यांना घेऊन सासरी शिवाजीनगर येथे एक महिन्यांपूर्वी आला होता. पत्नी पिंकी या मजुरी करत होत्या. दि. 19 सप्टेंबर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पती – पत्नी मध्ये भांडण झाले. अर्जुन पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. दारूच्या नशेत अर्जुन याने अडीच वर्षाचा मुलगा आयुष याला फरशीवर जोरात आपटले. यात आयुष गंभीर जखमी झाला. त्याला मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना काल रात्री 12 च्या सुमारास त्याचे निधन झाले.
या घटनेनंतर अर्जुन याने पोबारा केला होता. तो आपल्या अंत्रि बुद्रुक गावी गेला होता. पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने नागरिकांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.