अमरापुरात राष्ट्रवादीला बंपर लॉटरी; एक सदस्य असताना उपसरपंचपदाचा बहुमान : काँग्रेसमध्ये उभी फूट

सह्याद्री दर्पण
अमरापूर ता.कडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या जयवंत रुपनर यांची निवड झाली. माजी उपसरपंच सचिन पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. सरपंच सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी ग्रामविकास अधिकारी लीना देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
काँग्रेसकडून विजय मोरे यांना चार मते तर राष्ट्रवादीचे जयवंत रुपनर यांना पाच मते मिळाल्यामुळे त्यांची उपसरपंच पदी निवड झाली. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
यावेळी कडेगाव तालुका कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, माजी सरपंच शरद मोरे, संपत मोरे, मोहन पवार, सुबराव मोरे, राजाराम मोरे, विजय रुपनर, जालिंदर देशमुख, सागर मोरे, धनाजी माने, विठ्ठल मोरे, ईश्वर मोरे, शंकर रुपनर, संतोष रुपनर,सयाजी मोरे, फिरोज मुलानी, सचिन मोरे, सचिन देशमुख, ज्योतिराव मोरे, समाधान खरात, यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये उभी फूट
अमरापूर ग्रामपंचायतीत काँग्रेसचे पूर्ण बहुमत होते. उपसरपंचपदाच्या रिक्त जागेवर काँग्रेसचा उपसरपंच होणे अपेक्षित होते. पण चार सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक सदस्य होता. या सदस्याला दिवाळीआधी बंपर लॉटरी लागली. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसच्या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेस स्वार झाली.