तोंडोलीत भाच्यांचा मामा-मामीवर कुऱ्हाडीने हल्ला ; जीवे मारण्याची धमकी

सह्याद्री दर्पण
तोंडोली (ता. कडेगाव जि. सांगली) येथे शेतजमीन व विहिरीच्या पाणी पाळी कारणावरून भाच्यांनी मामा व मामीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. उदय उत्तम शिंदे (वय-37) व दत्तात्रय उत्तम शिंदे (वय-32) यांनी मामा किसन शामराव मोहिते व मामी सौ. समाताई किसन मोहिते यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करून जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. या बाबतची फिर्याद सौ. समाताई मोहिते यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किसन शामराव मोहिते हे दि. 7 डिसेंबर सकाळी 10 वाजता शेतातून घरी येत असताना त्यांच्या घराजवळील रस्त्यावर फिर्यादीचा भाचा उदय शिंदे हा किसन मोहिते यांच्या जवळ आला. यावेळी त्याने रानातील एकत्रात असलेली दोन गुंठे जमीन आम्हाला पाहिजे म्हणून शिवीगाळ करीत किसन मोहिते यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सौ. समाताई मोहिते या भांडण सोडविण्यास गेल्या असता दत्तात्रय उत्तम शिंदे याने उदय शिंदे याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला व कुऱ्हाडीच्या कोचीने त्यांच्या हाताच्या खांद्यावर मारले. यावेळी सौ. समाताई मोहिते यांचा पुतण्या संतोष तानाजी मोहिते हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तुम्हाला जीवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली.