कदम गटाचा पंचवीस वर्षांचा अभेद्य किल्ला देशमुख गट भेदणार?

दत्ता पवार
किल्ल्याचं महत्व आणि महती थेट शिवकाळात घेऊन जाते. बाजूबंद किल्ला स्वराज्याचा रक्षक म्हणून पुढं यायचा. दोन योद्धयातील चढाईत, लढाईत किल्ला यशस्वितेची साक्ष द्यायचा. हे झालं स्वराज्यातलं. त्याचा कदम – देशमुखांच्या राजकारणाचा संबंध येतो कुठं ? असं वाटणं रास्त. पण हाच धागा पकडत पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा पट खुला करायचा बेत ‘सह्याद्री दर्पण’ने ठरवला आहे.
योद्धयातील चढाई असो वा राजकारणातील लढाई, यात मैदान येतच. राजकारणातील जाज्वल्य मैदान म्हणून पलूस – कडेगाव मतदारसंघाकडं पाहिलं जातं. 45 वर्षांपूर्वी हे मैदान सज्ज झालं. या मातीत शेलक्या लढाया झाल्या. याच मातीनं स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांसारखा हिरा दिला. यामुळंच या मातीचा सुगंध सातासमुद्रापार जाऊन भिडला. डॉ. पतंगराव कदम यांच्या नावाने पलूस – कडेगाव मतदारसंघाला ओळखलं जायचं. कदम साहेबांचं राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर मोठं नाव झालं. पण त्यांना इथं संघर्षच करावा लागला. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून स्व. संपतराव देशमुख अण्णा यांच्याशी कदम साहेबांना कडवा संघर्ष करावा लागला. 1995 सार्वत्रिक विधानसभा आणि 1996 पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. कदम साहेबांचा पराभव करणारे संपतराव देशमुख कोण, हे पहायला राज्यभरातून लोकं आली होती. यावरून कदम साहेबांचं वजन आणि वलय अधोरेखित होतं.
सलग दोन पराभवाचा हादरा पचवून डॉ. पतंगराव कदम यांनी 1999 च्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीत मागील चुका आणि गाफीलपणाला फाटा देत कदम गटाने मुसंडी मारली. 2004 निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या राजकारणात पृथ्वीराज देशमुखांनी माघार घेतली. 2009 विधानसभा निवडणुकीत कदम साहेब आणि पृथ्वीराज देशमुखांची थेट लढत झाली. यात डॉ. पतंगराव कदम यांनी बाजी मारली. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख भाजपकडून रिंगणात आले. या निवडणुकीत मोदी लाटेचा मोठा अंमल होता. या मोदी लाटेला तडाखा देत डॉ. पतंगराव कदम यांनी दैदीप्यमान विजय संपादन केला. कदम साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर पोटनिवडणुकीत साहेबांचे पुत्र डॉ. विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले. 2019 विधानसभेला स्व. संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह देशमुखांनी तयारी केली. पण सेना – भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. या निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम 1 लाख 65 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. पुढं ते महाविकास आघाडी सरकारात राज्यमंत्री झाले.
तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यात काटा लढत होणार आहे. मागील पाच वर्षात जवळपास 1 हजार कोटींच्या विकासनिधीची बरसात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात केली आहे. ही त्यांची जमेची बाजू असली तरी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना छुपी पण उघड मदत करून केवळ 34 हजारांच्या आसपास मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. मताधिक्याचा हा आकडा कदम गटाला नक्कीच सुखावणारा नाही. एकूणच कदम गटाचा 25 वर्षांचा
बालेकिल्ला देशमुख गट भेदणार का ? हा औत्सुक्याचा आणि परीक्षेचा विषय ठरणार, हे नक्की…!