कदम – लाड कुटुंबाचं ठरलंय : शरद लाड
सह्याद्री दर्पण
भाजपाची विचारसरणी आणि कारभार आमच्या तत्वांशी विसंगत असून लाड आणि कदम कुटुंबाचं आता ठरलंय. त्यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पलूस तालुका तुमच्या पुढे राहील. याचे नियोजन झाले आहे. आता कडेगांव तालुक्याने डॉ. विश्वजीत यांना अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरदभाऊ लाड यांनी केले.
वांगी (ता.कडेगाव) येथे जि.प.गटातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी रमेश एडके यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयदीप यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, सागरेश्वरचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, युवक नेते दिग्विजय कदम, डी.एस.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद लाड पुढे म्हणाले, स्व. डॉ.पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांनी या मतदारसंघात मुलभूत सोयी- सुविधा बरोबर विविध संस्थांच्या उभारणीतून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शिवाय सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती साधली आहे. सारासार विचार करून भविष्यात लाड आणि कदम कुटुंबिय हातात हात घालून मतदारसंघात विकासाचे नवे पर्व साधणार आहे.
यावेळी क्रांतीचे संचालक वैभव पवार व रामभाऊ देशमुख, विठ्ठलदेव सोसायटीचे संचालक रवींद्र मोहिते, संजय पाटील, शामराव हुबाले, आबासो शिंदे, धनाजी सूर्यवंशी, दादासो कांबळे, मोहन मोहिते यांसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रा.सदस्य बुवाजी देशमुख यांनी आभार मानले.