ताज्या घडामोडी

डॉ. विश्वजीत कदम यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा : खासदार चंद्रकांत हंडोरे

भिलवडी
विधानसभा निवडणुकीत
महाविकास आघाडी सरकार आणायचे आहे, यासाठी पलूस -कडेगावचे विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

अंकलखोप ता.पलूस येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
यावेळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते स्व. डॉ.पतंगराव कदम यांचा वारसा डॉ.विश्वजीत कदम भक्कमपणे चालवत आहेत. त्यांचा मतदारसंघ आदर्श असा आहे. कोट्यवधींची विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यासाठी त्यांना साथ द्या. त्यांच्या पाठीशी ठाम राहा. विश्वजीत कदम यांना अंकलखोप या गावातून शंभर टक्के मतदान झाले पाहिजे, असे मत खा. हंडोरे यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, डॉ.पतंगराव कदम ज्येष्ठ नेते होते. कॅबिनेटमध्ये आम्ही सोबत असायचो. विलासराव देशमुख यांच्याकडे सतत कामासंदर्भात ते तगादा लावायचे. युवकांचे, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोर असायचा. साधा कार्यकर्ता म्हणून त्यांची कामगिरी होती. समाजकल्याण निधीतून या अंकलखोपमध्ये ४५० घरे उभी केली आहेत. त्याचे श्रेय डॉ. पतंगराव कदम यांनाच जाते. त्यांनी केलेलं कार्य पुढे नेण्यासाठी विश्वजीत कदम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे. आपले सरकार आता येणार आहे. आणि आपणा सर्वांना ते आणण्यासाठी मदत करायची आहे. आपलं सरकार मजबुतीने आले पाहिजे.
महिलांसाठी महाविकास आघाडी महिन्याला ३ हजार देणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून 3 लाखांपर्यंत कर्जे माफ करणार आहे. नियमित हप्ता जे शेतकरी भरतात त्यांना ५० हजार प्रोत्साहन म्हणून देणार आहे. जसे दर असतील तसा हमीभावही मिळणार आहे.
आरोग्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचा विमा शासन उतरणार. लोकशाहीबरोबर संविधानही टिकले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी विजय चव्हाण, धनंजय कांबळे, सुशील गोतपागर यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.