डॉ. शिवाजीराव कदम सरांची पुतण्या विश्वजीतांच्या प्रचारात भावनिक साद !
दत्ता पावर
चुलत्या – पुतण्याचं नातं, पिता-पुत्रांप्रमाणं गणलं गेलंय. वडीलकीचं प्रेम, वचक, हक्क अशा कैक बाबतीत चुलत्या- पुतण्याचं नातं गुंफलंय. असं जरी असलं तरी या नात्यांत दुरावाही पाहायला मिळतो. पण कदम कुटुंब याला अपवाद. या कुटुंबातून आमदार डॉ. विश्वजीत कदम विधानसभेची उमेदवारी करतायत. त्यांच्या प्रचारात डॉ. शिवाजीराव कदम सर तहानभूक हरवून प्रचार करतात. त्यांनी हिरिरीनं प्रचारात उतरणं, याला भावनिक पदर आहे. हा पदर काय ? कदम सर ‘ऍक्टिव्ह मोड’मध्ये का आले ? याचं खुलासेवार विश्लेषण पुढं करूया.
कदम कुटुंबाचा डंका महाराष्ट्राच्या क्षितिजावर तेजानं तळपत आहे. हे अप्रूप वाटत असलं तरी यामागं व्यथा, वेदना, कष्ट, जिद्द आणि मोठं स्वप्न दडलंय. कडेगाव तालुक्यातील दुर्गम इलाख्यात सोनसळ गावी डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म झाला. वादळात दिवा लावण्याचं त्यांचं स्वप्न. साहेबांनी स्वप्न पाहिलं नाही तर सत्यात उतरवलं. कदम कुटुंबाच्या परिस्थिती विषयी बोलायचं झाल्यास दारिद्र्य शब्दही शरमेनं मान खाली घालेल. या परिस्थितीत कदम साहेब शिकले, शिक्षण संस्था काढली, राजकारणात आले आणि यशस्वीही झाले.
जुन्या काळात एकत्रित कुटुंब पद्धतीला मोठं स्थान होतं. कालांतरानं ही पध्दत मोडकळीस आली. पण कदम कुटुंबात दुहीचा साधा ओरखडाही उठला नाही. हेच कदम कुटुंबाच्या यशाचं गमक आहे. हल्ली एकत्रित कुटुंब पद्धत दुर्बिणीतून शोधावी लागते, इतकी विषमता आली आहे. ज्या कुटुंबात राजकारण केलं जातं, तिथं दुहीचं भूत डोकं वर काढतं. हल्ली ही उदाहरणे डोळ्यांतसमोर दिसत आहेत. राजकारणातील तालेवार घराण्यांत उभ्या फुटीचं बीज रोवलं गेलंय. कदम कुटुंब याला अपवाद आहे. स्व.डॉ. पतंगराव कदम साहेबांचं वादळी व्यक्तिमत्त्व होतं. पण कुटुंबात कधीच वादळ आलं नाही. म्हणून तर हे कुटुंब यशाची शिखरे सर करत आहे.
कदम साहेबांच्या पश्चात डॉ. विश्वजीत कदम सामाजिक व राजकीय वारसदार म्हणून पुढं आलेत. कदम बंधू , पुतणे असा मोठा गोतावळा असतानाही डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. साहेबांच्या माघारी डॉ. विश्वजीत कदम यांच्या मोठ्या लढाईची ही निवडणूक. कदम साहेबांनी नावारूपाला आणलेला हा मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरला आहे. अख्ख कदम कुटुंब प्रचारात व्यस्त आहे. कदम साहेबांचा एकहाती किल्ला लढविणारे वनश्री माजी आमदार मोहनराव कदम दादा वयोमानामुळं सक्रीय नाहीत. कदम साहेब आपल्यात नाहीत. ज्येष्ठ बंधू मोहनराव दादा वयस्कर झालेत. पुतण्या निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे, अशा प्रसंगात डॉ. शिवाजीराव कदम सरांनी पालकत्वाची जबाबदारी घेतली.
कदम सरांचा आणि राजकारणाचा दुरान्वये संबंध नाही. आपण भलं आणि आपलं भारती विद्यापीठ. एकमार्गी माणूस म्हणून सरांच्याकडं पलूस-कडेगाव मतदारसंघ पाहतो. पुतण्याला एकाकी पडू द्यायचं नाही. वडिलकीचा भार आपल्या खांद्यावर आहे, हे जाणून सरांनी मतदारसंघाची भ्रमंती सुरू ठेवली आहे. कदम सरांकडं आपुलकीनं पाहिलं जातं. त्यांचं व्यक्तिमत्व निवडणुकीत कामाला येताना दिसत आहे. सर ज्या गावात जातात तिथं लोकं गर्दी करून राहतात. सर पुतण्याला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करतात आणि मतदार त्यांना होकारही देऊन टाकतात. पुतण्यासाठी चुलत्याची धडपड पाहून लोकं सरांची वाहवा करताना जराही हात आखडता घेत नाहीत.