मणिपूर ते केनिया; 7300 किमीचा प्रवास करणाऱ्या अमोरी ससाण्याचा कडेगावातला मुक्काम !
दत्ता पवार
मानवाला सीमांच बंधन. पक्षांना कुठलं. मुक्तविहार आणि संचार हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क. याच हक्कातून अमोरी ससाण्याची 7300 किलोमीटरची थक्क करणारी झेप पाहणार आहोत. त्याच्या प्रवासातील सांगली जिल्ह्यातील कडेगावचं स्थान. या पक्षानं कोठून कुठं प्रवास केला, याचा सविस्तर उलगडा करणार आहोत. तर मग चला पाहूया, जाणून घेऊया… अमोरी ससाण्याची “ती” उत्तुंग भरारी !
मानव आणि पशू-पक्षांत अंतर ते काय? हो अंतर आहे. अंतर आहे ते नैतिकतेचं, नितीमूल्यांचं आणि शिस्तीचं. मानवात आणि पशू-पक्षांत महत्वाचं अंतर आहे ते विचारशक्तीचं. मानवाला विचारशक्तीचं वरदान मिळालंय. पशू-पक्षी विचारशक्तीला मुकले. याबाबत मानव किती सजग आहे ? हे मोठं कोडंच. या कोड्यातून सुटका करून घ्यायची असल्यास पशू-पक्षांच्या जगात जावं लागंल, डोकावून पाहावं लागंल. हे कटू आहे, पण सत्यही. मानव आणि पशू-पक्षांत गुरफटून न जाता मूळ मुद्द्याला हात घालूया…
जगभरात, भारतात विविध जातीचे पक्षी आढळतात. त्यातील एक ससाणा. ससाणा प्रजातीत विविध प्रकार आढळून येतात. आपल्याकडं बहिर ससाणा मोठ्या प्रमाणात आढळतो. याच ससाणा प्रजातीत भाव खाऊन जाणारा अमोरी ससाणा. याच अमोरी ससाण्याविषयी बात करणार आहोत. त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम ठोकणार आहोत.
खासकरुन उत्तर चीनमध्ये अमोरी ससाणा आढळून येतो. अमोरी ससाण्याला भ्रमंतीचं मोठं वेड. या वेडातून त्यानं चीन सोडलं आणि भारत गाठलं. भारतात मणिपूर, नागालँड इथं विश्रांतीचा विसावा घेतला. चीन सोडताना आफ्रिका खंडात जाण्याचं त्यानं ध्येय बाळगलं. मणिपूर मुक्कामातून त्यानं उड्डाण घेतलं. ओडिशा किनारपट्टी धरत त्यानं तेलंगणात झेप घेतली. 16 नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यातील कडेगावात उतरला. येथील प्रसिद्ध पावलेल्या डोंगराई देवीच्या डोंगर कपारीत आश्रय घेतला. एक रात्रीचा मुक्काम आटोपून त्यानं 17 नोव्हेंबरच्या भल्या पहाटे उड्डाण ठोकलं.
कडेगाव मुक्कामातून झेप घेणाऱ्या अमोरी ससाण्यानं कोकण प्रदेशात प्रवेश केला. कोकणातील गुहागर येथील गोपाळगडावरुन अरबी समुद्रात भरारी घेतली. शेकडो किलोमीटरचा प्रवास एका दमात न थकता न रुकता करत त्यानं सोमालिया गाठलं. सोमालियातून त्यानं केनिया या आवडीच्या देशात प्रवेश घेतला. आज तो तिथला आनंद लुटत आहे.
केनियातील थंड हिवाळ्याचा मनमुराद आस्वाद आणि आनंद लुटण्यासाठी अमोरी ससाणा सालाबाद प्रमाणे याही वर्षी दाखल झाले. थंड हिवाळ्याचा आस्वाद चाखल्यानंतर आपल्या मायभूमीत उत्तर चीनमधल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. परतीचा हा प्रवास एप्रिल, मे महिन्यांत करेल.
अमोरी ससाण्याचा रंजक प्रवास टिपण्याचं श्रेय जातं ते शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेश यांना. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयोग आहे. ते अमोरी ससाणा पक्ष्याला सॅटेलाईट टॅग लावतात. त्यातून त्याचा प्रवास, विसाव्याची ठिकाणं याचा उलगडा होतो. अमोरी ससाण्यानं 14 नोव्हेंबरला मणिपूर येथून उड्डाण घेतलं. केनियात तो 27 नोव्हेंबरला विसावला. अवघ्या 13 दिवसांत 7300 किलोमीटरचा अमोरी ससण्याचा प्रवास थक्क करणारा आहेच शिवाय आधुनिक समजणाऱ्यांना मोठी चपराक.