दहशत बिबट्याची; सोय पर्यटकांची : सागरेश्वर अभयारण्यातील उपक्रम !
दत्ता पवार
पर्यटनाची हौस लोकांत ठासून भरलेली आहे. हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाची हौस भागवून घेतात. पर्यटनात जंगल सफरीची मौज दांडगी. पडेल ती किंमत मोजून पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतात, लुटतात. पर्यटनात दुष्काळी भागातील सागरेश्वर अभयारण्याची निवड हमखास होते. इथली हरणं लोकांचं लक्ष वेधून घेतात. पण अलीकडच्या काही वर्षात या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आणि पर्यटक दहशतीत आले. पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटकांची पर्यटनाची भूक भागावी, म्हणून वन खात्यानं पर्यटकांसाठी सफारी वाहने तैनात केली आहेत.
आशिया खंडातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य, ही ख्याती सागरेश्वर अभयारण्याची. स्व. धो. मो. मोहिते अण्णा अभयारण्याचे शिल्पकार. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे इथं आहे, सागरेश्वर अभयारण्य. हा भाग दुष्काळी, मग अभयारण्य कसं उभारणार ? हे प्रश्न धो. मो. अण्णांसमोर होते. यावर मात करत त्यांनी अभयारण्याला मूर्तस्वरुप दिलं. अनेक वर्षे अण्णा अभयारण्याची देखभाल करत. कालांतराने वन विभागाने अभयारण्याचा ताबा घेतला. तिथून अभयारण्याला घरघर लागली.
अभयारण्यात हरीण, सांबर आदी प्राणी मुक्त संचार करतात. या प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. अभयारण्याच्या बंदिस्त भागात राहणाऱ्या हरणांनी बंदिस्त भिंत भेदत बाहेरचा रस्ता धरला. सह्याद्री पर्वत रांगांची शेवटची किनार अभयारण्याला लाभली आहे. याच किनारपट्टीच्या कुशीत हे अभयारण्य वसलं आहे. अभयारण्याच्या निर्मितीपासून शाळकरी मुलांपासून अबाल वृध्दांपर्यंत पर्यटक भेट देतात. मुक्त संचारामुळे हरणांनी परिसर व्यापून टाकला आहे. त्यांचा मोठा त्रास शेतकरी सोसत आहेत.
बिबट्याची दहशत
मागील काही वर्षात अभयारण्य परिसरात बिबट्याचा वावर वाढला. बिबट्याला मुबलक खाद्य मिळत आहे. लोकांना बिबट्या नजरेस पडायचा. पण वन विभागाला दिसायचा नाही. हा विभाग कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत होता. बिबट्याची दहशत गावोगावी पसरल्याने लोकांचा दबाव वाढला, तेव्हा कुठं वन विभाग जागा झाला. बिबट्याचे ठसे अभयारण्यात उमटू लागले. मग वन विभाग खडबडून जागा झाला. पर्यटकांची गर्दी आणि धोका ओळखून वन विभागाने दोन सफारी वाहने तैनात केली. आता यात आणखी दोन वाहनांची सोय केली आहे. बिबट्याच्या दहशतीची वन विभागानं हाय खाल्ली आहे. यामुळं पर्यटकांसाठी सफारी वाहनातून अभयारण्याची सफर घडवली जात आहे.