मोहन भागवतांचा तीन मुलांचा सल्ला देशाला कुठं घेऊन जाईल !
दत्ता पवार
मोठं कुटुंब सुखी कुटुंब, असं जुन्या जमान्यात म्हंटलं जायचं. हल्ली मोठं कुटुंब दुःखी कुटुंब, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणतायत तीन मुलं जन्माला घाला. संख्याशास्त्राचा त्यांचा हा अनाहूत सल्ला देशाला कुठं घेऊन जाईल. त्यांचा सल्ला समाजमन मानील ? त्यांच्या दृष्टिकोनातून हे हिताचं असंल तर त्यांनी केंद्र व राज्य सरकारला हुकूम सोडावा. सध्याची शासन यंत्रणा त्यांच्या हुकमाचा ताबेदार राहील.
मोठं कुटुंब पद्धती ही आपल्या संस्कृतीचा भाग होतं. मोठं कुटुंब असणं हे सर्वांगानं श्रेष्ठ मानलं जायचं. गतयुगात हे ठीक होतं. त्या काळात ती गरज होती. हल्लीच्या जीवन पद्धतीचा विचार करता भागवतांचा सल्ला कुणाला पटंल. देशाची सद्यस्थिती पाहता, हे परवडणारं आहे ?
देश दारिद्र्याशी झुंजतोय. कमालीची भूकमारी आहे. लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकं सरकारी धान्याची वाट पाहत आहेत. त्याचा सत्ताधाऱ्यांना अभिमान वाटतो. या लोकांना मोफत धान्य देत आहोत, हा डंका पिटला जातो. देश महासत्ता होण्याच्या दिशेने, असा दावा केला जातो. देशातील निम्मी जनता भुकेकंगाल आहे. यातून महासत्तेचा दावा किती खोकला आहे, हे स्पष्ट होतं.
आर्थिक पातळीवर देश कमालीचा खचला आहे. सरकारी पातळीवर हे मान्य होणार नाही. पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी नाही. वरवरचे फुगीर आकडे फेकले जात असले तरी लोकांची आर्थिक नाडी आवळून गेली आहे. बेरोजगारांचे तांडे निर्माण झालेत. लोकांना हाताला काम नाही. भूक भागवायला अन्न नाही, अशा संक्रमणात तीन मुलं जन्माला घालणं देश हिताचं आहे?
लोकसंख्येत भारत जगात सर्वश्रेष्ठ ठरलाय. हा क्रमांक आगामी काही शतकात कायम राहील. अशात मोहन भागवतांचा तीन मुलांचा “गोंडस” सल्ला न पचणारा, न रुचणारा आहे. त्यांनी याबाबत लोकांना उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या सत्ताधाऱ्यांना फर्मान सोडावं. लोकं त्यांच्या तीन मुलांच्या उपदेशाला भीक घालणार नाहीत. पण त्यांचा अनाहूत सल्ला सत्ताधारी ऐकतील? मागील काही दशकात दांपत्य दोनवरून एक मुलात सुख शोधतायत. “दो से भले एक” म्हणतायत. आणि भागवत म्हणतायत, तीन मुलं जन्माला घाला. हे कोणत्या गृहीतकावर विचार मंडतायत, हे त्यांनाच ठाऊक. हा विचार नक्कीच देश प्रगतीत, हितात खोडा घालणारा आहे, हे नक्की !