एकनाथ शिंदे साहेबांचं रुसणं खरंच व्यवहार्य !
दत्ता पवार
रुसणं, हट्ट धरणं आणि रागावणं मनुष्य स्वभावाचा गुणधर्म. सर्वमान्य जीवनात या घटना नित्याच्याच. पण राजकारणात असा अनुभव येतो तेव्हा याला काय म्हणावं. जनतेचं पालकत्व घेणारेच या वर्तनातून जात असतील तर जनतेनं नेमकं काय करावं? असाच अनुभव राज्यातील जनता घेत आहे. निवडणुका झाल्या. महायुतीनं प्रचंड यश मिळवलं. पण रुसणं, फुगणं, हट्ट धरणं हे नाट्य संपता संपना झालं. झटाझट निकाल लागला. खटाखट सरकार स्थापन होईल, हा समज फोल ठरला. याच्या केंद्रस्थानी आलेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. त्यांचा हा पवित्रा खरंच व्यवहार्य आहे ?
मागील पाच वर्षात राजकारणातील उलटफेर झाले ते सर्वश्रुत. त्यात वेळ न घालवता सध्याचं पाहूया. निकालानंतर महायुती जलदीनं सरकार स्थापन करेल, असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी तसं होऊही दिलं नाही. राजकारणात महत्वाकांक्षा बाळगणं नवं नाही. पण त्याला व्यवहाराची जोड हवीच. या जोडला फाटा देत भाजप मोठा भाऊ असताना शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. ती भाजपची अपरिहार्यता होती. आता तशी परिस्थिती नाही. मग काळजीवाहू मुख्यमंत्र्यांत एवढं बळ कोठून आलं? यामागं अनेक कारणं आहेत.
राज्याच्या राजकारणात पर्यायानं समाजव्यवस्थेत प्रभुत्व राखणारा मराठा समाज. एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजात सध्याला लोकप्रिय आहेत. जोडीला लाडका भाऊ ही उपाधी साथ देत आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केल्याचा त्यांचा दावा आहे. यात तथ्यही असू शकतं. पण राहतो प्रश्न संख्याबळाचा. संख्याबळात शिंदे साहेब दोन नंबरला, यातही मोठं अंतर. दोन नंबर असताना तीन नंबरच्या धाकट्या भावाला सन्मानाचं स्थान मिळतं, हे त्यांना न रुचणारं आहे. धाकटा भाऊ अजित दादा पवार सत्तेच्या सारीपटात भाव खाऊन गेलेत. अजित दादांची आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री वरचढ ठरत आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लागलेले डाग, आरोप पुसण्यात सत्ताकाळत यश मिळवलं. जनतेत खास करून मराठा समाजात त्यांच्या बद्दल आपुलकी आहे, हेही खरं आहे. राजकीय भाग सोडता शिंदे साहेबांची दानशूर बाजू जमेची आहे. या बळावरच आधी मुख्यमंत्री आणि आता महत्वाच्या मंत्रीपदांसाठी त्यांचं रुसणं, हट्ट धरणं आणि रागावणं आलं आहे. पण त्यांच्यात एव्हढी हिंमत कोठून आली, याचं कोडं जनतेच्या मनात घर करून आहे.