मारकडवाडी रातोरात स्टार झालेलं गाव; देशाचा कानाकोपरा व्यापला !
दत्ता पवार
स्टार होणं कुणाला नाही आवडत. स्टार होण्याचं भाग्य लागतं, त्याला नशिबाची साथ हवी. मनुष्य आणि स्टार होणं अथवा प्रसिद्धीला पावणं स्वभाव गुणधर्म. व्यक्तिगत स्टार होणं त्याच्या मेहनतीचं फळ मानलं जातं. पण जेव्हा अख्ख गाव स्टारपणाची झूल अंगावर घेतं, तेव्हा या गावात विशेष काही दडलंय याचा भाव प्रकट होतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव सध्याला सबंध भारतभर चर्चेत आलंय. निमित्त ठरलीया विधानसभा निवडणूक.
दुष्काळी टापूत मोडणारं. पण कणा ताठ असणारं गाव मारकडवाडी. गाव जेमतेम अडीच-तीन हजार लोकवस्तीचं. गाव जरी वाडीसदृश असलं तरी गावातील लोकांची छाती कणखर. याचा प्रत्यय नुसता आला नाही तर लोकशाहीच्या संस्थांना हादरवून टाकून गेलं. दिल्लीच्या खिजगणतीतही या गावाची पोहच नव्हती. पण गावानं दखल घ्यायला भाग पाडलं. हे का पाडलं, हे सर्वश्रुत आहे. फारसं राजकारणावर बात न करता, “गाव करतं ते राव” करत नाही, याकडं पाहूया.
ग्रामीण भागात गाव करतं ते राव करत नाही, हे परवलीचं वाक्य. पण हे गाव भलतंच करामती निघालं. गावानं थेट संवेदानिक संस्थांना “चॅलेंज” दिलं. त्यांचं चॅलेंज मोडून काढलं गेलं. पण गाव देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चेत आलं.
पारतंत्र्यात नाना पाटलांचं प्रतिसरकार जाणून आहोत. स्वातंत्र्यात लोकशाहीत मारकडवाडीनं जुनी आठवण ताजी केली. गावानं सरळ सरकार आणि निवडणूक आयोगाला अंगावर घेतलं. त्यांचा उद्देश जरी सफल झाला नसला तरी गावाच्या हिमतीला दाद दिलीच पाहिजे. प्रति निवडणूकीची तयारी केल्यानं गाव गेली दोन-तीन दिवस प्रकाशझोतात राहिलं. नुसतं राहिलं नाही तर देशभर गाजलं. लोकशाही जिवंत आहे, याचं झणझणीत उत्तर दिलं. भलं त्यांचं कृत्य कायद्याच्या कक्षेत येत नसलं तरी गावानं दाखवून दिलं. गावाची चर्चा अख्ख्या भारतात सुरू आहे. खास करून हे सोशल मीडियावर सर्वाधिक “ट्रेंड” मध्ये राहिलं. गावानं राजकारणाबरोबर समाजमन हलवलं, यात तसूभरही दुमत असण्याचं कारण नाही.