भाजप विरोधकांची अग्निपरीक्षा !
दत्ता पवार
युद्ध कोणतंही असो तिथं विरोधकाला कमजोर करणं एवढंच ध्येय असतं. रणांगणातील युद्ध असो वा राजकीय सारीपाटावरील, तिथं विरोधी आघाडीला क्षम्य केलं जात नाही. याच अनुभवातून गेली दहा वर्षे देशातलं राजकारण जात आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उभारी घेण्यास किंचितही उसंत दिली नाही. याचाच परिपाठ गिरवायचा झाल्यास महाराष्ट्र त्याला अपवाद राहणार नाही. भाजप राजवट महाराष्ट्रात सुरू होत आहे. यामुळं विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांना आगामी काळ खूपच खडतर तितकाच आव्हानात्मक राहणार आहे.
विधानसभा निवडणुका पार पडल्या. निकाल लागला. सत्ता स्थापन होत आहे. निकालावर अविश्वास दाखवला जात आहे. दावे-प्रतिदाव्यात राज्य ढवळून निघालं आहे. महायुती सरकार स्थापन करण्यात दंग आहे. विरोधक न्यायासाठी झुंजत आहेत. त्यांची झुंज कितपत तग धरणार याचं उत्तर काळाच्या पोटात दडलं आहे. याला महायुती जुमानणार नाही.
२०१४ पासून देशाचं राजकारण पार बदलून गेलं. पारंपरिक राजकारण बाजूला फेकलं गेलं. आला तर स्वागत नाही तर नेस्तनाबूत, ही रणनीती काम करत आहे. मोदी राजवट सुरू झाल्यापासून विरोधक पूर्णतः असाह्य झाला आहे. विरोधकांची चौफेर नाकाबंदी केली आहे. सहानुभूती, समानुभूतीतून पाहिलं जात नाही. अस्सल आणि व्यवहारी राजकारणाचा पट मांडला जात आहे.
महाराष्ट्रात महायुतीचं पर्व सुरू होत आहे. बक्कळ बहुमतात महायुती विराजमान झाली आहे. विरोधक खूपच नाजूक स्थितीत आले आहेत. मागील पाच वर्षे भाजपकडे संख्याबळ असतानाही सत्तेचा एककलमी कार्यक्रम राबवता आला नाही. आता सत्तेचा सोपान हातात आहे. या बळावरच भाजप सर्वंकष चालींचा वापर करत राज्यातील राजकारणावर पक्की मांड ठोकणार. विरोधकांना जेरीस आणलं जाईल. भाजप नीतीसमोर विरोधक बेजार होतील. त्यांचा लढा चालू राहील पण आवाज ऐकला जाईल? भाजप नेहमी दूरदृष्टीचं राजकारण करतंय, असं म्हटलं जातं. यात तथ्यही आहे. याच दूरदृष्टीतून भाजप आगामी दहा-पंधरा वर्षांचं बीजारोपण करेल. तेव्हा विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई नक्कीच सोपी राहणार नाही. त्यांना अग्निपरिक्षेचा सामना करावाच लागेल.