आत्मविश्वास गमावलेल्या महाविकास आघाडीपुढं आव्हान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं !
दत्ता पवार
आत्मविश्वासानं यश पदरात पडतं. अपयशावरही आत्मविश्वास काम करतो. पण अपयश जर अस्तित्वावर उठलं तर आत्मविश्वास क्षीण होतो. अशाच संक्रमण काळातून महाविकास आघाडी जात आहे. अनपेक्षित पण धक्कादायक अपयशाने शिलेदारांपासून सैनिकांपर्यंत आत्मविश्वास गमावून बसले आहेत. त्यांच्यापुढं आव्हान आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आत्मविश्वास सर्वोच्च स्थानी पोहचला होता. पाच महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. यातून महाविकास आघाडी अजून बाहेर आली नाही. कार्यकर्त्यांनी कच खाली आहे. कार्यकर्ताच खचला असंल तर पक्षापुढं उपाय राहत नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांना आधी स्वतःला सावरावं लागंल. कार्यकर्त्यांत जोश भरावा लागंल. हे एव्हढं सोपंही नाही आणि साधंही नाही.
लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरी गेली. त्यांचा पराभव इतका दारुण झाला की, यावर विश्वास बसणं अशक्य आहे. बेजार झालेली ही आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विचार करतेय. पण कार्यकर्ता आत्मविश्वास हरवून बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं वातावरण होतं. निकाल विपरीत लागला. पैसा, ई.व्ही.एम.वर ताशेरे मारणे सुरू आहे. यावर मतमतांतरे आहेत. पण यावर महाविकास आघाडी ठाम आहे. त्यांचा हा मुद्दा ऐकला जाईल याची सुतराम शक्यता दिसत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा सोपान न्यायालयाच्या हातात आहे. यावर मार्गही निघू शकतो. निवडणुका होऊ शकतात. महायुती तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करेल. पण उरतो मुद्दा तो महाविकास आघाडीतील पक्षांचा. ते या निवडणुकीला कसं सामोरे जाणार? ई. व्ही. एम.ची शंका त्यांच्या मनात घर करून आहे. यावर कोणताही उपाय त्यांच्यासमोर दिसत नाही. नेत्यांनी कितीही लढायचं म्हंटलं तरी आत्मविश्वास गमावलेला कार्यकर्ता कसा उभारी घेणार. एकूणच महाविकास आघाडीसमोर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सत्वपरीक्षा ठरणार, हे नक्की !