निवडणूक

शरद पवार साहेबांनी आपल्या गावाचं कौतुक केलं : मारकडवाडीकरांना अप्रूप !

दत्ता पवार
कौतुकाशिवाय माणूस रिता राहतो. रित्यापणात कुढत बसतो. कौतुक व्हावं, असं सर्वांनाच वाटतं. पण कौतुकास्पद कामगिरी करायला कितीजणं तयार असतात. कौतुकाची कामगिरी असामान्य असंल तर कौतुकाचा वर्षाव झाल्याबिगर राहत नाही. याच अनुभवातून माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव जात आहे. देशभरातून कौतुकाची थाप गावावर पडत आहे. आज शरद पवारांनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन गावकऱ्यांचं कौतुक केलं. याचं भलतंच अप्रूप गावकऱ्यांना वाटतंय.

सबंध देशाच्या अप्रुपाच्या ठिकाणी आलेली कामगिरी मारकडवाडीच्या लोकांनी केली आहे. मतदान प्रक्रियेवर देशभरात खास करून विरोधी पक्षांत असंतोष आहे. ई. व्ही.एम.वर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. सामजिक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाचा मार्ग धरत आहेत. पण त्यांना यश येत नाही. संशयाच्या भोवऱ्यात निवडणूक प्रक्रिया अडकली आहे. सत्ताधारी-निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्षांची लढाई तीव्र होत आहे. यात विरोधकांच्या हाती काही लागत नाही. अशात दुष्काळी भागातील मारकडवाडी गावानं हिंमत दाखविली. त्यांच्या हिंमतीनं सत्ताधाऱ्यांपासून निवडणूक आयोगानं हाय खाल्ली. हे गाव देशव्यापी चर्चेत तर आलंच आहे, शिवाय कौतुकास पात्र ठरलं.

दुष्काळी मुलखातील लोकांकडं पाहण्याचा दृष्टीकोन फार आशादायक राहिला नाही. दुय्यम स्थानावरूनच त्यांचं मोजमाप होतं. दुष्काळी लोकही आपण भलं आणि आपलं काम, हे त्यांचं राहणीमान. पण ज्यावेळीं नैतिकता, स्वाभिमानावर एखादा प्रसंग गुदरतो तेव्हा दुष्काळी बाणा जागा होतो. याच बाण्याची चर्चा उभ्या देशात सुरू आहे. मारकडवाडीनं असं काही कर्तृत्व सिध्द केलं, त्यानं भल्याभल्यांना आकर्षित केलं. याच आकर्षणातून शरद पवारांना मारकडवाडीला भेट देण्यावाचून गत्यंतर उरलं नाही.

माढा लोकसभा मतदारसंघात येणारं मारकडवाडी गाव. शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते. पण त्यांच्याही ध्यानीमनी नासणारं हे गाव. या गावानं करामत अशी केली की, पवारांना गावात येऊन गावकऱ्यांचं कौतुक करणं भाग पाडलं. थेट निवडणूक आयोग आणि सरकारशी पंगा घेणारं गाव रातोरात “स्टार’ झालं. स्टारपद मिळविलेल्या गावाला शरद पवारांनी भेट दिली, सभा घेतली. भाषणादरम्यान त्यांनी गावावर स्तुतीसुमने उधळली. गावकऱ्यांच्या निश्चयाचं आणि धाडसाचं मोठं कौतुक केलं. देशभरात मारकडवाडीची चर्चा सुरू असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. एवढा मोठा नेता गावात प्रथमच येणार याचं मारकडवाडीकरांना कुतूहल होतं. त्यात त्या नेत्यानं कौतुक करावं, हे त्या पुढचं होतं. पवार साहेबांच्या भाषणानंतर गावकरी कुजबुज करत होते. पवार साहेबांनी आपल्या गावाचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.