निवडणूक

मारकडवाडीच्या रणांगणात देवेंद्र फडणवीसांचा तोफखाना !

दत्ता पवार
इतिहासात तोफखान्याला अग्रस्थान होतं. रणांगणात तोफखाना सरस असंल तर यश नक्की मानलं जायचं. पानिपतची लढाई मराठ्यांनी हरली. पण लक्षात राहिला तो इब्राहिम गारदीचा तोफखाना. इतिहासात तोफखाना रणांगण गाजवायचा. हल्लीच्या राजकीय रणांगणात मुख तोफखाना. महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतांचा अस्सल खेडूत तोफखाना गर्जत राहतो. तो आता मारकडवाडीच्या युद्धभूमीत अवतरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून हा तोफखाना मैदान गाजवायला निघाला आहे.

मारकडवाडी माळशिरस तालुक्यातील खेडं. इथली लोकं साधीभोळी. पण त्यांच्यातली रग दांडगी. ही रग त्यांच्या कृतीतून, व्यवहारातून जाणवत होती. पण राजकीय रग अख्खा देश डोळे विस्फारून पाहत आहे. आम्ही खेडूत असलो म्हणून काय झालं. आम्हालापण आमचा स्वाभिमान, अस्तित्व आणि हक्क आहे. त्यांच्यातील याच हक्कानं पेट घेतला आणि अख्ख्या भारतातल्या राजकारणाला भाजून काढलं. ही धग इतकी वाढली की, सत्ताधाऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत आगीच्या पुढ्यात आले.

राजकारणात सध्याला ई. व्ही.एम. शिवाय कोणतीच बात होत नाही. मारकडवाडीच्या हिमतीनं हे सर्व घडवून आणलं. विरोधी पक्ष यावर तुटून पडला. सत्ताधाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर केला. पण उपयोग होईना झाला. विरोधी धार दाह पकडत आहे. याला प्रतिआव्हान म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उडी घेतली. त्यांनी आपल्या भात्यातील बिन्नीचे अस्त्र बाहेर काढलं. या अस्त्रांना महाराष्ट्र तोफखाना म्हणून ओळखतो. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, हा तोफखाना ठासून भरलेला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी बत्ती दिली आहे. बत्ती मुंबईत दिली. पण तोफखान्याचा आवाज मारकडवाडीत धडाडणार आहे.

संकटकाळी मदतीला येणाऱ्या तोफखान्याचा पुरेपूर वापर फडणवीसांनी केला आहे. हाच तोफखाना पुन्हा रणांगणात उतरवला आहे. मारकडवाडी धनगर बहुल गाव. यामुळं गोपीचंद पडळकर यांची निवड झाली. सदाभाऊ खोतांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली. या मतदारसंघातलं मारकडवाडी. यामुळं खोतांची निवड पक्की झाली. पडळकर आणि खोत सांगली जिल्ह्यातील. ग्रामीण ढंगातला आणि अर्वाचक शब्द फेकीत गर्जना, ही त्यांची ओळख. त्यांच्या शब्द फेकीत कित्येक गारद झालेत. त्यांच्या मुखातून केव्हा काय बाहेर येईल त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बाहेर काढलं. शत्रू गोटात खळबळ उडवून द्यायची, ही युद्ध नीती म्हणून वापरली जायची. हीच नीती फडणवीस वापरत आहेत. त्यांचा या तोफखान्यावर प्रचंड विश्वास. सेनापतीचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमदार पडळकर आणि खोत मारकडवाडीच्या रणांगणात उद्या उतरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.