मारकडवाडीचं रण पेटलं !

दत्ता पवार
रणांगणात दोन्ही बाजूनं शक्ती अजमावली जाते. मग ते युद्ध रणभूमीवरील असो वा राजकीय पटलावरील. अंदाज घेत डावपेच आखले जातात, आडाखे बांधले जातात. सरशी कोणाची होणार हे अंतिम परिणितीत ठरतं. मारकडवाडीत कुरुक्षेत्र तयार झालंय. मारकडवाडीच्या भूमीवर राजकीय युद्ध पेटलंय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनं ही भूमी भाजून निघाली आहे.
मारकडवाडी रातोरात प्रसिद्धीस आलेलं गाव. निमित्त ठरली विधानसभा निवडणूक. निवडणूक झाली, निकाल लागला. पण मारकडवाडीची निवडणुकीची रग काय कमी झाली नाही. माळशिरस विधानसभा मतदारसंघातलं हे गाव. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) असा सामना झाला. राष्ट्रवादीचे उत्तम जानकर विजयी झाले. पण मारकडवाडीचं समाधान काय झालं नाही. त्यांचं मत होतं, आम्ही जानकर साहेबांना मत दिली. पण मतमोजणीत आम्ही दिलेली मतं गेली कुठं? इथूनच हे गाव उभ्या देशात चर्चेत आलं.
अनधिकृत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. पण प्रशासनानं हे होऊ दिलं नाही. यामुळं तर गाव जास्तच भाव खाऊन गेलं. राजकीय नेते मंडळी येऊ लागली. खासदार शरद पवार आले. त्यांची सभा झाली. मतदान प्रक्रियेवर त्यांनी संशय व्यक्त केला. याला तोड म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास टीम मारकडवाडीत दाखल झाली. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी शेलक्या भाषेचा वापर करत सभा गाजवली.
ई. व्ही.एम.वर संशय घेणारं मारकडवाडीचं राजकीय आखाड्यात रूपांतर झालं. राजकारण कुठंपर्यंत जाईल, याचा नेम नाही. ई. व्ही.एम.च खरं खोटं काय, याचं उत्तर मिळंल का? हे अनुत्तरीत. पण राजकीय मंडळींना सभा गाजविण्यासाठी मारकडवाडीनं नवं व्यासपीठ खुलं केलं, रण गाजवायला मैदान दिलं, हे खरं.