महाराष्ट्र

कन्हैय्या कुमार, खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडींचा नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल

सह्याद्री दर्पण
देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही. हा इतिहास सध्याच्या हुकूमशाही राजवटीत महाराष्ट्राने दाखवून दिला आहे. इंग्रजांची राजवट या मातीतील क्रांतिकारकांनी उलथून टाकली. आत्ताच्या राज्यकर्त्यांना उलथवून टाकण्याची धमक या मातीत आहे. मणिपूर जळत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंडावर पट्टी बांधून आहेत. जुलमी राजवटीचा शेवट करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल कन्हैय्या कुमार व खासदार मोहम्मद प्रतापगडी यांनी केला.

माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगावात युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

कन्हैय्या कुमार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांची ही भूमी आहे. या भूमीने आणखी एक कर्तबगार पुत्र दिला. त्यांचं नाव डॉ. पतंगराव कदम. त्यांचं कार्य अजोड आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र डॉ. विश्वजीत कदम त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांच्या कार्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांचं मोठं स्थान आहे. देशात जुलमी राजवट राज्य करीत आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूर जळत असताना पंतप्रधान मणिपूरच नाव घ्यायला तयार नाहीत.

खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी म्हणाले की, देश संक्रमणकाळातून जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. देशात जाती-धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. पण कडेगावच्या मोहरमने हिंदू-मुस्लिम ऐक्याची दिशा दिली आहे. देशात कडेगावचा मोहरम प्रसिद्ध आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्याविरोधात लढा दिला पाहिजे. डॉ. विश्वजीत कदम यांना ताकद दिली पाहिजे. हाथरस सारख्या घटना रोज घडत आहेत. देशाची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडू पंतप्रधान यांच्या दारात मेडल ठेवत आहेत. बलात्काऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. या विरोधात राहुल गांधी लढत आहेत. त्यांना शक्ती दिली पाहिजे. “डरो मत” नारा बुलंद केला पाहिजे. मी महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलो आहे. येथील जनतेचा मी आभारी आहे.

आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षात सुरुवात केली आहे. त्यांची शिकवण मला प्रेरणादायी आहे. त्यांचं कार्य मी पुढं नेत आहे. महिला शिक्षण व दरडोई उत्पन्नात पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ ग्रामीण महाराष्ट्रात प्रथम आहे. सरकार दप्तरी ही नोंद आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त आलेली प्रमुख मंडळी तोलामोलाची आहेत. मतदारसंघातील जनतेने मला प्रेम दिले. त्यांची सेवा हे माझे कर्तव्य आहे. मी घाबरून राजकारण करत नाही.

यावेळी ना. दिनेश गुंडूराव (मंत्री कर्नाटक), आ. सतेज पाटील, आ. संजय जगताप, आ. राजू आवळे, आ. अशोक चांदना ( राजस्थान ), आ. भुवन कापरी ( उत्तराखंड ), आ. रविंद्र धंगेकर, आ. डॉ. विक्रांत भुरिया, आ. झीशन सिद्दीकी यांची भाषणे झाली.

यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, अमीर शेख (अध्यक्ष, एन. एस. यु. आय. ), श्रीमती जयश्रीताई पाटील ( उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ) कुणाल राऊत ( अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ), विशाल पाटील, शांताराम कदम यांची उपस्थिती होती. स्वागत आमदार विक्रम सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.