आमदार साहेबांनी दिलं पोलिसांना निवाऱ्याचं छत !
दत्ता पवार
संवेदनशील आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा पोलीस निवाऱ्यासाठी हालअपेष्टा सहन करतोय. देशातील प्रत्येकाला घर, अशी मोठ्यानं घोषणा केली जाते. पण लोकांचं रक्षण करणारा पोलिसांवर ‘घर देता का घर’ ही म्हणण्याची वेळ येते. या परिस्थितीतून कडेगावचे पोलीस कसं सुटतील. त्यांच्या व्यथा, वेदनांची कणव आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेबांना आली. आपला पोलीस हक्काच्या निवऱ्यासाठी झगडतोय हे लक्षात येताच त्यांनी यावर सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला. यात त्यांना यश मिळालं. तब्बल 59 घरांची त्यांनी मंजुरी आणली. सत्तेत नसतानाही त्यांच्या कार्याची वाहवा होत आहे.
कडेगाव पोलीस ठाण्याला ब्रिटिश राजवटीपासून इतिहास आहे. जुनं ते नवं पोलीस ठाण्यात रूपांतर झालं. पण पोलीस हक्काच्या घरापासून दूर राहिला. कडेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस घरासाठी भटक्यांचं जिणं जगू लागला. इथं पोलीस लाईन आहे. पण अपुरी सुविधा आणि मोडकळीस आली आहे. 24 तास कामावर ही पोलिसांची ड्युटी. अशावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात राहणं भल्याचं ठरतं. खास करून महिला पोलिसांना खूपच सोयीचं ठरतं.
सरकार कोणतंही असो पोलिसांच्या या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक राहिला आहे. लोकप्रतिनिधी इतर विकासावर भर देतात. मात्र पोलिसांच्या निवास्थानाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. याबाबत स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी नेहमीच पोलिसांच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचाच वारसा चालविणारे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पोलिसांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने लक्ष घातले. पोलिसांच्या घरांचा प्रश्न निकाली काढला. पोलिसांनी आमदार साहेबांचे आभार मानले.