ताज्या घडामोडी

पलूस – कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच

दत्ता पवार

1999 स्थापनेपासून 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत स्थितीत होती. 2014 माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी भाजपात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाली. राष्ट्रवादीत जान आणणं सोपं नव्हतं. आमदार अरुण अण्णा लाड आणि शरद लाड पितापुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. जनाधारहीन पक्ष उभा करताना त्यांना संघर्ष करावा लागला. आता राष्ट्रवादी काँग्रेस जोमानं पुढं जाऊ लागली आहे.

पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात पक्ष सापेक्ष राजकारण चालत नाही. इथं व्यक्तीनिष्ठ राजकारणाची सवय आहे. या मतदारसंघात कदम, देशमुख आणि लाड गट असे राजकीय समीकरण आहे. यात कदम गट पॉवरफुल तर देशमुख गट तुल्यबळ. लाड गट पलूस तालुक्यात जेमतेम ताकद राखून होता. लाड गटाने देशमुख गटाची संगत केली. आता कदम गटाबरोबर त्यांची जवळीक आहे. देशमुख गट भाजपात गेला आणि कदम गटाबरोबर त्यांचा घरोबा झाला. कदम व लाड गट एकत्रित आणण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली.

राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलली. त्याची छाया या मतदारसंघात पडली. मध्यंतरीच्या काळात अरुण अण्णा लाड पदवीधर निवडणुकीत विजयी झाले. अण्णा आमदार झाल्याने लाड गटाला संजीवनी मिळाली. कार्यकर्त्यांना हक्काचा आमदार मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस विस्तारासाठी अण्णा आमदार होणं लाभदायक ठरलं. पलूस तालुक्यात जेमतेम ताकद दाखविणाऱ्या लाड गटाने कडेगाव तालुक्यात आवर्जून लक्ष केंद्रित केले. कदम व देशमुख गटातील नाराज लोकं थेट लाड गट जवळ करू लागले. कार्यकर्ता सांभाळण्याच्या हातोटीमुळे पक्षाची ताकद वाढू लागली. कडेगाव तालुक्यात खास करून युवानेते शरद लाड यांनी जातीने लक्ष घातले. पलूस तालुका त्यांच्या हक्काचा असला तरी कडेगाव तालुका कोरडा ठाक होता. आता परिस्थिती बदलली. गावोगावी लाड गट पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पोहचली. महाविकास आघाडीमुळे लाड गट कदम गटाबरोबर राहील. दूरदृष्टीचा विचार करत अरुण अण्णा व शरद लाड पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.